मेंदूत रक्तस्त्रावाच्या घटनांत वाढ
मेंदूत रक्तस्त्राव झालेला रुग्ण पंधरवड्यात एखादा-दुसरा येत असे. अलिकडे आठवड्यात दोन रुग्ण दाखल होत आहेत. चांगली जीवनशैलीच तणावमुक्त जीवन देवू शकते. त्यासाठी सकस आहार घ्या. नियमित व्यायाम करा. गरज नसताना खाऊ नका. कोणत्याही कारणाने तणाव घेवू नका व इतरांना देवू नका. रक्तदाबाच्या नेहमीच्या गोळ्या चूकवू नका. मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या रुग्णाला वेळेत योग्य डॉक्टरांपर्यंत पोहोचवा. जीवनशैलीत बदल करून मेंदूतील रक्तस्त्राव व उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतो. आपले आरोग्य आपल्याच हाती आहे, हे लक्षात ठेवा.
डॉ. शिवशंकर मरजक्के
मेंदू शल्यचिकित्सक, सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी मठ
........................................................................
बदललेले खाद्य पदार्थ, जीवन पद्धती, पैशासाठी सुरु असलेले अतिश्रम व कामाच्या ठिकाणचे मानसिक त्रास यामुळे शरीरावर ताण वाढत आहे. यातून अतिरक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. परिणामी अतिरक्तदाबामुळे मेंदूत रक्तस्त्राव होण्याच्या घटनातही वाढ होत असल्याचे चित्र आहे.
पूर्वी लोक कामावरून आले तरी तणाव फारसा नव्हता. काळ बदलला आणि जगण्याची पद्धत बदलून गेली. पैशासाठी दोन-दोन ठिकाणची कामे करून जगण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा मिळवण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरु झाले. खानपानाच्या सवयी बदलल्या. माणसाकडे पैसा आल्यामुळे हॉटेलमध्ये जाणे, जेवणाची पार्सल मागविण्याकडे कल वाढला. यातून शरिराच्या पोषणाकडे दुर्लक्ष होत आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चमचमीत पदार्थ आणि फास्टफूडवर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातही हॉटेलिंगचे प्रमाण वाढले.
त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याची धावपळ असते. साईड बिझनेस सुरु केले आहेत. शरिराला आवश्यक नसताना तेलकट, तिखट पदार्थ जाऊ लागले. वेळी-अवेळी पोट भरणे सुरु झाले. याचा परिणाम शरीरावर होवू लागला असून वयाच्या ३० ते ४० वर्षातच रक्तदाबाचे, मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत. अतिरक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होण्याच्या घटनांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. अॅन्यरिझम प्रकारामध्ये रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव होतो. त्यामुळे झालेल्या रक्तस्त्रावामुळे ५० टक्के पेशंट जागेवरच मयत होतात. २५ टक्के पेशंट कोमात जातात. उर्वरित २५ टक्के रुग्णांची प्रकृती स्थिर राहते. ही टक्केवारी अॅन्युरिझमशी संबंधित आहे. उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या रक्तस्त्रावाशी नाही. रक्तस्त्रावाचे प्रमाणे थंडीच्या दिवसात जास्त असते. वेळेत डॉक्टरांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. योग्य ठिकाणी योग्य वेळेत पेशंट पोचविल्यास रुग्ण बचावण्याची शक्यता जास्त असते.
.......
नेमके काय होते ?
मेंदूतील रक्तस्त्राव या आजारात रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात. जादा रक्तदाबाने त्या फुटतात. छोट्या रक्तवाहिन्या फुटल्या तर थोडे नुकसान होते व ते भरुन येते. मोठ्या रक्तवाहिन्या फुटल्या तर मेंदूचे खूप नुकसान होते. ५० ते ६० वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून येते आहे. मेंदूत रक्तस्त्राव होणे ही एक कॉमन गोष्ट होत आहे. अतिताणामुळे मेंदूत रक्तस्त्राव होतो आणि आतील भागात गंभीर दुखापत होऊन अपंगत्व येते.
In News I Sakal Kolhapur Today Page 3 I 12 March 2022